सोलापूर – भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथील प्राचार्य ‘डॉ. अनिल देशमाने’ यांच्या संशोधन कार्याला उल्लेखनीय यश मिळाले असून, मायक्रोस्कोपमधील प्रतिमा थेट भिंतीवर प्रोजेक्ट करण्यासाठीच्या अभिनव मॉडेलवर कॉपीराइट विषयक पेटंट प्रकाशित झाले आहे.
हे संशोधन मॉडेल शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे असून, प्रयोगशाळांमधील अध्यापन अधिक प्रभावी आणि आधुनिक पद्धतीने सादर करण्यास मदत करणारे आहे. पारंपरिक मायक्रोस्कोपमध्ये प्रतिमा एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना दिसत नसल्यामुळे अध्यापनात मर्यादा येत होत्या. मात्र डॉ. देशमाने यांनी विकसित केलेल्या या मॉडेलमुळे मायक्रोस्कोपमधील प्रतिमा मोठ्या आकारात भिंतीवर प्रोजेक्ट करता येणार असून, संपूर्ण वर्गाला ती स्पष्टपणे पाहता येणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रविंद्रजी गायकवाड, सचिवा सौ अनामिका गायकवाड मॅडम यांनी डॉ. अनिल देशमाने सर यांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधनात्मक कार्याचे कौतुक केले. तसेच या पेटंटमुळे महाविद्यालयाच्या संशोधन संस्कृतीला चालना मिळाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांनीही डॉ. देशमाने सर यांचे अभिनंदन केले असून, या यशामुळे भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूरच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे.























