सोलापूर : शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव जी. के. फाऊंडेशन, पुणे यांनी महापालिकेसमोर मांडला आहे. सीएसआर निधी आणि देणग्यांच्या माध्यमातून या रुग्णालयाची उभारणी व संचालन करण्यात येणार आहे.
महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, माजी महापौर श्रीकांचन यन्नम, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, रोहिणी तडवळकर, निर्मला जंगम, राजशेखर पाटील, सुनील खटके, सत्यजित वाघमोडे, विजय चिप्पा, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, वीणा पवार, नगर अभियंता नीलकंठ मठपती उपस्थित होते.
प्रस्तावित रुग्णालयात हृदयरोग, कर्करोग, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अतिदक्षता विभाग, कॅथलॅब, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, केमोथेरपी आणि डायलिसिससारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेकडून सुमारे १८ हजार चौरस फूट जागा ३० वर्षांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. बांधकाम, वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि संचालनाचा संपूर्ण खर्च फाऊंडेशन करणार आहे. वीज आणि पाणी सुविधा मोफत देण्याची मागणीही करण्यात आली आहे. जागा, प्रशासकीय मान्यता आणि प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.फाऊंडेशनचे संस्थापक गुंडाप्पा खडके आणि प्रकल्पप्रमुख मकबूल तांबोळी यांनी माहिती दिली.
——–
Views: 49