बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समितीच्यावतीने सोमवारी महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई येथील व्याख्यात्या भाषा अभ्यासक तथा निरुपणकार डॉ. धनश्री लेले या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले या होत्या.
यावेळी डॉ. धनश्री लेले यांनी ‘माझ्या मना रे ऐक जरा’ यावर प्रेरणादायी निरुपण केले. त्या म्हणाल्या, मन दिसत नाही. पण ते प्रत्येकाला आहे. जे दिसत नाही ते जाणून घेणे महत्वाचे आहे. चांगले शिक्षक व आई मुलांचे डोळे वाचतात. मन हे अतिशय चंचल आहे. मन हे प्रचंड सामर्थ्यवान आहे. ते दाहीदिशांना जाते. आजची मने मोबाईलच्या आहारी गेली आहेत. मनाला शोधण्याचा प्रयत्न करा. आज प्रत्येकजण मनाच्या बाबतीत अस्वस्थ आहे. मनाची शक्ती प्रचंड आहे. जिवंतपणा, जिज्ञासा, जिव्हाळा, जिद्द, जिओ और जिने दो हे पाच ‘जी’ मनाला मिळाल्यास जीवन सुंदर होईल. मन सजग राहणे गरजेचे आहे. मन संवेदनशील असावे. सर्वांनी एकसंघ राहण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, असे शैक्षणिक वातावरण असावे. अवघड विषयात अभिरुची निर्माण करा. एकमेकांशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. आई-वडिलांवर मनापासून प्रेम करा. अंगी जिद्द बाळगा. जे पटकन मिळतं, ते पटकन संपतं. त्यामुळे प्रयत्न, कष्ट व मेहनतीला पर्याय नाही. सकारात्मकता जोपासा. छोट्या अपयशाने घाबरुन जाऊ नका, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमतेची ओळख ठेवा आणि संधी मिळेल तिथे पुढे या. समाजातील प्रत्येक सकारात्मक बदलामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, प्रशासन, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे पुढे येत आहेत आणि हे चित्र अधिक व्यापक व्हावे, हीच अपेक्षा आहे. गरजू महिला व मुलींसाठी बार्शी नगरपरिषद सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्यावतीने स्वागत गीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या सचिव प्रा. सौ. मंजुषा श्रीमंगल यांनी केले. प्रमुख पाहुण्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांचा परिचय डॉ. सौ. विजयश्री गवळी यांनी करुन दिला. सन्मान पत्राचे वाचन डॉ. सौ. एल.आय. राठोड यांनी केले. आभार डॉ. सौ. एस.एस. सुरवसे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सौ. ज्योती यादव आणि डॉ. दैवशाला रसाळ यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त, प्राचार्य, शाखाप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थीनी, बार्शी व धाराशिव तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















