सोलापूर : महानगरपालिकेच्या मालकीच्या विविध गाळेधारकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र गाळेधारकांना थकबाकीवरील १०० टक्के दंड व शास्ती माफ करण्यात येणार असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली ३० जून रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर , सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच नगरसेविका रोहिणी तडवळकर उपस्थित होत्या.
महापौर कोंड्याल यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ महापालिकेच्या मेजर गाळे, मिनी गाळे, बीओटी गाळे, २५६ योजनेतील खुल्या जागांचे धारक तसेच अधिकृत खोकेधारकांना मिळणार आहे. या सर्वांवरील दंड व शास्तीची रक्कम शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे.
ही योजना १० ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार असून मार्च २०२६ अखेरपर्यंतची थकबाकी विचारात घेऊन दंडमाफीचा लाभ दिला जाणार आहे. गाळेधारकांनी या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महापौर कोंड्याल यांनी केले.
महापालिकेच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून थकबाकीमुळे अडचणीत असलेल्या गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्याचबरोबर महापालिकेच्या महसूल वसुलीलाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
—-
Post Views: 7