सोलापूर – महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही निवडणूक सकाळी ११ वाजता पार पडणार असून, त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीकडून सर्व नगरसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता महापालिकेतील पक्षनेता कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आवाहन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित ८७ नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक सोलापूर येथील सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीस शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, गटनेते नरेंद्र काळे, महापौर पदाचे उमेदवार विनायक कोंड्याल, उपमहापौर पदाच्या उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर, सरचिटणीस नारायण बनसोडे, महिला मोर्चा अध्यक्षा रंजीता चाकोते, सरचिटणीस सुधा अळीमोरे यांच्यासह शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान गटनेते नरेंद्र काळे यांनी उपस्थित नगरसेवकांना सभागृहातील शिस्त, पक्षाची भूमिका आणि मतदान प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. यानंतर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सभागृहात जाण्यापूर्वी पक्षनेता कार्यालयात सर्व नगरसेवकांना कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज होऊ नये व पक्षाची एकजूट कायम राहावी यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या बैठकीत भाजपाकडून अधिकृतपणे सर्व नगरसेवकांना व्हीपही बजावण्यात आला. आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित करण्यासाठी पक्ष संघटनेने कंबर कसल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

















