बार्शी – शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे तसेच वस्तु विक्रीच्या माध्यमातून संभाषण कौशल्य, गणितीय क्रिया आणि नफा-तोटा यांची माहिती होण्याच्या उद्देशाने यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोजर इंग्लिश स्कूलच्यावतीने शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी “आनंद बाजार”चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री. बावकर आणि शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक श्री. शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रिटा नेटके उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्यावतीने प्रसाद सर आणि तुषार सर यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना श्री बावकर म्हणाले की, प्रत्येकास आता नोकरी मिळणे कठीण झाले असून या सारख्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण आपले भविष्य उज्वल करावे. शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांना मिळालेले हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आनंद बाजारात भाजीपाला, फळे, स्टेशनरी, वडापाव, इडली-सांभर, मूग वडा, हुरडा, ढोकळा, सौंदर्य प्रसाधने , भेळ, चाटभांडार, शालेय साहित्य, चॉकलेट, बिस्कीटे, ज्यूस, आईसक्रीम या सारख्या वस्तुंचे जवळपास ६७ स्टॉल लावण्यात आले होते. आपले कौशल्य पणाला लावत विद्यार्थ्यांनी सुमारे ४० हजारांची विक्री केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली नष्टे यांनी तर सर्व स्टॉलचा जमाखर्च लिहिण्याचे काम सौ. अमृता शहा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ. नेटके यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






















