सोलापूर : शहरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर प्रक्रिया करता यावी, यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे ६४ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले कचरा हस्तांतरण केंद्र गेल्या वर्षभरापासून बंद आहे. जुळे सोलापूर येथील एचएसआर पाण्याच्या टाकीजवळ उभारण्यात आलेल्या या केंद्राचा वापरच होत नसल्याने कचरा वर्गीकरणाचा मूळ उद्देश धुळीस मिळाला आहे.
सोलापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरातील कचरा संकलनाचे काम वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी महापालिकेच्या सुमारे २०० घंटागाड्या कार्यरत असून, त्यांच्यामार्फत दररोज अंदाजे ३०० टन कचरा संकलित केला जातो. या कामापोटी संबंधित मक्तेदाराला महापालिकेकडून दरमहा सुमारे एक कोटी ८० लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंत रक्कम अदा केली जाते.
शहरातील कचरा संकलन करताना ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी नागरिकांमध्येही सातत्याने जनजागृती केली जाते. घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकांद्वारे नागरिकांना कचरा वेगवेगळा देण्याचे आवाहन केले जाते. अनेक नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देत घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून घंटागाड्यांमध्ये टाकतात. मात्र, नागरिकांनी वेगळा दिलेला कचरा पुढे एकत्र केला जात असल्याचे चित्र असल्याने संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ओला आणि सुका कचरा स्वतंत्र करण्यासाठी स्मार्ट सिटी अर्थात सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून जुळे सोलापूर येथे स्वतंत्र कचरा हस्तांतरण केंद्र उभारण्यात आले. सुमारे ६४ लाख रुपये खर्चून उभारलेल्या या केंद्रात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही बसविण्यात आली. संकलित कचरा या केंद्रात आणून त्याचे वर्गीकरण करणे आणि त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी पाठविणे, असा या यंत्रणेचा उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात गेल्या वर्षभरापासून केंद्र बंद असल्याने या सुविधेचा वापरच होत नाही.
विशेष म्हणजे, वर्गीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध असतानाही तिचा वापर केला जात नसल्याचे समोर येत आहे. शहरातून संकलित केलेला कचरा केंद्रात आणून त्याचे वर्गीकरण करण्याऐवजी तो एकत्रितपणे मोठ्या वाहनांमध्ये भरून पुढे पाठविला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्र उभारणीसाठी केलेला खर्च, त्यामागील नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांचा मेळच बसत नसल्याचे दिसून येते.
शहरात स्वच्छतेचा नारा दिला जात असताना कचरा वर्गीकरणासाठी उभारलेले केंद्र वर्षभरापासून बंद राहणे ही गंभीर बाब आहे. केंद्र बंद ठेवण्यामागचे नेमके कारण काय, यंत्रणेची देखभाल आणि संचालनाची जबाबदारी कोणाची, तसेच कचरा संकलनाच्या मक्त्यातील अटींचे पालन होते की नाही, याची चौकशी होणे आवश्यक आहे. दरमहा कोट्यवधी रुपये खर्च करूनही कचरा व्यवस्थापनाचा मूळ उद्देश साध्य होत नसेल, तर या खर्चाचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन केंद्र पुन्हा कार्यान्वित करावे आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी वर्गीकरण करायचे,
मग यंत्रणेने काय करायचे?
एकीकडे महापालिका नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा देण्याचे आवाहन करते, तर दुसरीकडे संकलित कचऱ्याचेच वर्गीकरण होत नसेल, तर या जनजागृतीचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांनी जबाबदारीने कचरा वेगळा द्यायचा आणि महापालिकेच्या यंत्रणेने तो पुन्हा एकत्र करायचा, हा प्रकार स्वच्छतेच्या संकल्पनेलाच हरताळ फासणारा आहे.
———
Views: 14