बार्शी – पुणे येथे एसटीआय म्हणून कार्यरत असलेल्या व मूळच्या अंजनगाव (उ) येथील पूनम मस्तूद यांना सिंधुदुर्ग सम्यक संबोधी संस्थेतर्फे कवी नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्था अध्यक्ष किशोर कदम यांची याबाबत माहिती दिली.
मराठीतील नव्या कवीची गुणवत्ता सर्वदूर पोहोचावी, या हेतूने प्रत्येकी पाच कविता मागवून त्यातील एका गुणवंत कवीला कवी नामदेव ढसाळ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्रातून ७० कवींनी पाठविलेल्या कवितांमधून ही निवड करण्यात आली आहे.
परीक्षक, प्रसिद्ध नाट्य लेखक-दिग्दर्शक कवी आणि कथाकार उदय जाधव (मुंबई) यांनी कवयित्री पूनम मस्तूद निवडीबद्दल म्हटले की, पूनम मस्तूद यांच्या पाचही कविता माणसाच्या मनातील हुरहूर, आठवण, दुरावा आणि स्वतःचा शोध याभोवती गुंफलेल्या आहेत. जाणाऱ्या माणसांची वाट पाहणं, न पूर्ण झालेल्या भेटींची सल आणि आयुष्यातील अपूर्णतेची जाणीव त्यांनी अत्यंत हळव्या शब्दांत मांडली आहे. या कविता वाचकाला स्वतःच्या भूतकाळाकडे, नात्यांकडे आणि स्वतःशी होणाऱ्या ओळखीकडे घेऊन जातात.