सोलापूर – शहरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार सुभाष देशमुख, महापौर विनायक कोड्याल,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते महाराजाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता.
शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता डाळिंब आड येथील मैदानात भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. यानंतर महाप्रसादाचे वाटप करून शिवजयंती उत्सवाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. परिसर जय भवानी जय शिवाजी घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
शिवजयंती उत्सवामुळे शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापालिकेतील नगर अभियंता, विद्युत विभाग तसेच घनकचरा विभागातील स्वच्छता कर्मचारी महिलांचा मध्यवर्तीच्यावतीने शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, कार्याध्यक्ष उत्तरा बरडे- बचुटे, संजीवनी मुळे, उज्वला साळुंखे, राजन जाधव, श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, नगरसेवक विनोद भोसले, शिवाजी वाघमोडे, ज्ञानेश्वर सपाटे, बाबासाहेब जाधव, दत्तामामा मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास घुले, सचिन स्वामी यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.




















