सोलापूर : शहर सायबर पोलीस स्टेशनने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, गेल्या ३ वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्क्वेरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि मोडस ऑपरेंडी या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्लेन सिक्क्वेरा हा २०२२ पासून परदेशात (लाओस) वास्तव्यास होता. त्याने तिथे चिनी आणि मलेशियन साथीदारांशी संगनमत करून भारतीय नागरिकांना ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये १० ते ३०० टक्के इतका अवाढव्य परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून एका फिर्यादीची तब्बल ६२,६५,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.तपासात निष्पन्न झाले आहे की, आरोपीने फसवणुकीची रक्कम ‘AL HAREEM HAJIJ UMRAH SERVICES’ आणि ‘BLACKSEED SOLUTIONS AND SERVICE’ यांसारख्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केली होती. त्यानंतर ही रक्कम ‘यूएसडीटी’ (डिजिटल करन्सी) द्वारे क्रिप्टो वॉलेटवर ट्रान्सफर करण्यात आली होती.आरोपी परदेशातून कारवाया करत असल्याने त्याच्याविरुद्ध ‘लुक आऊट नोटीस’ (LOC) जारी करण्यात आली होती. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी तो भारतात परतत असल्याची माहिती मिळताच, इमिग्रेशन विभागाच्या मदतीने त्याला अहमदाबाद विमानतळावर रोखण्यात आले. सोलापूर सायबर पोलिसांनी तातडीने तिथे पोहोचून त्याला ताब्यात घेतले.
न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात अन्य एक आरोपी तन्वीर याकुब चौगुले रा. मुंब्रा याचाही समावेश असून, त्याच्या बँक खात्यांविरुद्ध महाराष्ट्रात एकूण ९२ ऑनलाईन तक्रारी असल्याची माहिती समोर आली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा व पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे, प्रवीण भोपळे व इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली आहे.






















