सोलापूर : या वर्षीच्या स्व.प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती जीवन गौरव पुरस्कारासाठी सांगोला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ.बी.एच. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी माऊली महाविद्यालय वडाळा येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा.डॉ. शीला भानुमते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख स्व. प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते यांचे 4 जानेवारी 2017 रोजी आकस्मिक निधन झाले. सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे ते कार्यकारिणी सदस्य होते. परिषदेच्या पुढाकारातून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भानुमते व रामपूरे परिवार सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकास त्यांच्या अर्थशास्त्र विषयातील भरीव कामगिरी बद्दल तसेच महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील संशोधन, लेखन, सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेतील योगदान इत्यादी बाबी लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर केला जातो. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सपत्नीक सन्मानपूर्वक प्रदान केला जातो. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्प गुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे निवड समिती सदस्य प्रा. उत्तमराव हुंडेकर यांनी सांगितले.
या पूर्वी प्रा.डॉ. दामजी, प्रा.जी एस हरकुड, प्राचार्य डॉ जी. एन. चिट्टे, प्राचार्य डॉ. आ.गो.पुजारी, प्रा. उत्तमराव हुंडेकर, प्रा.पी. के. शहा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये सदस्य म्हणून भानुमते व रामपूरे परिवाराच्या वतीने प्रा. उत्तमराव हुंडेकर, प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी व प्रा. डॉ. संग्राम चव्हाण यांनी काम पाहिले.
या पत्रकार परिषदेस अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ. संतोष कदम, परिषदेचे सचिव डॉ. अमोल खाडे, प्राचार्य डॉ. शिरीष भोसले, प्रा.डॉ. शंकर राजे, प्रा.डॉ. अविनाश जम्मा, प्रा. डॉ. बद्रीनाथ दामजी, प्रा. डॉ. संग्राम चव्हाण आदी उपस्थित होते.




















