सोलापूर – अवंती नगरमध्ये ओढ्याजवळ एक पक्षी जखमी अवस्थेत दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सोलापूर वन विभागाचे रेस्क्यूअर प्रवीण जेऊरे यांना असल्याची माहिती मिळाली असता wcas चे अजित चौहान यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वसंत विहार जवळील नाल्यात Black-Headed Ibis (काळ्या डोक्याचा शराटी, कुदळ्या) या प्रजातीचा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला, त्याच्या शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या.
परंतु नाल्यात उतरण्यास अडचण येत असल्याने त्यांनी वन विभागाच्या वनरक्षक अनिता शिंदे यांना फोन करून या पक्ष्याला रेस्क्यू करण्याविषयी मदत मागितली. वन विभागाचे प्रवीण जेऊरे आणि मुन्ना निरवणे यांनी घटनास्थळी धाव घेत निरवणे यांनी ओढ्यात उतरून त्या जखमी पक्ष्याला रेस्क्यू केले व त्याला पुढील उपचारासाठी वनविभागाच्या टीईटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कुदळ्या हा पक्षी साधारणपणे पाणथळ व गवताळ भागात आढळणारा पक्षी असून ढालकीटक, मासे, बेडूक, खेकडे, सरडे हे त्याचे खाद्य आहे. हे पक्षी पाण्यात उभ्या असलेल्या किंवा जवळच्या झाडांवर काटक्या वापरून घरटे बांधतात.




















