सोलापूर – लैंगिक अत्याचारी आरोपी लक्ष्मण विठठल शिंदे, वय ३० वर्षे, रा गप्ता. मोहोळ याला २० वर्षे सश्रम कारावास आणि रुपये १०,०००/- दंड डी. एन. सुरवसे, जिल्हा न्यायाधीश-३, सोलापूर यांनी ठोठावला आहे.
यात हकीकत अशी की, आईविना असणाऱ्या अज्ञान पिडीतेच्या घरातील सर्व लोक कार्यक्रमासाठी परगावी गेलेले असताना, घरात कोणी नाही यावर लक्ष ठेवून पिडीता घरात एकटी असल्याचा फायदा घेवून घराच्या पाठीमागे राहणाऱ्या आरोपी लक्ष्मण शिंदे याने दुपारी २ च्या समारास पिडीतेच्या घरी जावून घराला आतून कडी लावून पिडीता विरोध करत असतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व सदरची घटना कोणाला सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपीच्या धमकीला घाबरुन पिडीतेने सदरची घटना कोणास सांगितली नाही.
परंतु घटनेनंतर काही दिवसात पिडीतेस उलट्या व डोकेदुखीचा त्रास सुरु झाल्यामुळे तिला हॉस्पीटलमध्ये घेवून गेल्यावर ती गर्भवती असल्याबाबत डॉक्टरांनी सांगितले. आई नसलेल्या पिडीतेच्या आजीने त्याबाबत तिच्याकडे चौकशी केली असता तिने आरोपी लक्ष्मण शिंदे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सांगितली.
पिडीतेने मोहोळ पोलीस स्टेशन येथे जावून फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल झाल्यावर त्यामध्ये सखोल तपास होवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.
विशेष न्यायालयात चौकशी दरम्यान पिडीता, पिडीतेची आजी, डॉक्टर यांच्या साक्षी या प्रकरणात महत्वाच्या ठरल्या. तसेच पिडीतेचा, पिडीतेच्या गर्भाचा व आरोपीचा डीएनए रिपोर्ट सारखा आल्यामुळे पिडीतेच्या साक्षीला पुष्टी मिळाली. आरोपीच्या दुष्कृत्यामुळेच पिडीता गर्भवती राहिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सरकारी वकील शीतल डोके यांचा युक्तिवाद ग्राहृय धरुन न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३७६ (२) (एन) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि र.रु.१०,०००/- दंडाची व भा.दं.वि. कलम, ५०४, ५०६ प्रमाणे १ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
यामध्ये सरकारतर्फे अॅड. शीतल डोके, अॅड. पी.एस. जन्नू यांनी काम पाहिले तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉस्टेबल राजू पवार व लेडी कॉस्टेबल काळे यांनी मदत केली.



















