पंढरपूर – तालुका पोलिसांनी एकूण १३ गायीच्या लहान वासरांना जीवनदान दिल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या बाबत माहिती देताना मुजावर यांनी सांगितले की, या मध्ये घटना अशी आहे की २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास गोरक्षक श्री. घाटे व मानस परिचारक यांनी फोन द्वारे माहिती दिली की पुळुज गावातील शारदानगर येथे चारा पाण्याविना लहान गाईची एकूण १३ वासरे एका जाळीमध्ये बांधलेल्या अवस्थेत आहेत व काही वेळाने ती खाटकाकडे घेऊन जाणार आहेत अशी माहिती आपणास मिळताच आपण तात्काळ ही माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह पुळुज येथे कारवाई केली असता एका झाडाखाली एकूण लहान-मोठ्या आकाराची१३ गायींची वासरे बांधलेले आढळली. त्यांना चारा पाणी वगैरे काहीही सोय त्या ठिकाणी केलेली नव्हती. सदरची जनावरे क्रूरपणे बांधून ठेवलेल्या अवस्थेत होती व खाटकाकडे कत्तलीसाठी देण्याच्या तयारीत असताना व ती जनावरे गंगाराम साहेबराव वाघमोडे (रा. पुळूज) याने बांधून ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. दरम्यान वाघमोडे यांनी ती जनावरे खटकाकडे द्यायच्या अगोदरच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून एकूण १३ गायीच्या वासरांचे प्राण वाचवले.
याबाबत गोरक्षक मानस माधव परिचारक (रा. पंढरपूर) यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गंगाराम साहेबराव वाघमोडे यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दतीने क्रूरपणे वागणूक देणे या कायद्याअंतर्गत तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान पंढरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईचे सर्व नागरिकांमध्ये कौतुक होत आहे. तालुका पोलिसांनी १३ गायीच्या लहान वासरांना ताब्यात घेऊन गोशाळेमध्ये जमा केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहाय्यक फौजदार विजू गायकवाड, पोलीस हवालदार दीपक भोसले, सुहास देशमुख, मंगेश रोकडे, संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, अभिमन्यू गरड, चालक हसन नदाफ यांच्या पथकाने केली.

























