सोलापूर – रोहित पवार यांच्या जीवितास संभाव्य धोका असल्याचा आरोप करत त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) व युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.
कार्यकर्त्यांच्या मते, अजित पवार यांच्या कथित विमान दुर्घटनेप्रकरणी राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंकांवर आमदार रोहित पवार सातत्याने पत्रकार परिषदांमधून प्रश्न उपस्थित करत आहेत. ही दुर्घटना नसून सुनियोजित कट असू शकतो, असा संशय व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करण्यात आला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय यंत्रणेकडून सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नवी दिल्लीस्थित खाजगी विमान वाहतूक कंपनीवर तातडीने बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत, आमदार रोहित पवार यांना त्वरित झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी व त्यांच्या जीवितावरील संभाव्य धोका टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवा सेनेचे उपसचिव रणजीत बागल, डॉ. योगेश रणदिवे, प्रशांत गायकवाड, मुसा आत्तार, अजित पात्रे, अमित मोतेवार, मिलिंद गोरे, मोहित निकम, अमरसिंह खांडेकर, युनुस अत्तार आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींना मत व्यक्त केल्यामुळे धोका निर्माण होत असेल, तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

























