सोलापूर – भारत सरकार यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ‘मेरा युवा भारत’ या अभियानांतर्गत भव्य मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. तरुणाईमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर व स्मरण व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सोलापुरात जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाच्या वतीने सकाळी ठीक ७.०० वाजता चार पुतळा (हुतात्मा चौक) ते जिल्हा परिषद कार्यालय या मार्गावर भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत वालचंदच्या कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच एनसीसीचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. देशभक्ती आणि शिवभक्तीच्या घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
या पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक जीवराज कस्तुरे व क्रीडा शिक्षक राहुल हजारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी व शिवरायांच्या विचारांप्रती आदर अधिक दृढ झाला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






















