सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात संपूर्ण फाल्गुन महिना धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त रविवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या २११ धारकऱ्यांनी गणपती घाटावर सामूहिक मुंडण करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन केले.
सोलापूर शहरातील ११७, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ४२ जणांनी सामूहिक मुंडण केले. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासानिमित्त मोठ्या संख्येने मुंडण केले.
क्रूरकर्मा मुघल शासक औरंगजेब याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडल्यानंतर महिनाभर त्यांचा प्रचंड छळ करून अत्यंत क्रूर हत्या केली. देव – देश आणि धर्मासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी बलिदान दिले. त्यांची आठवण म्हणून हिंदू बांधवांकडून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा संपूर्ण महिना धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.
या संपूर्ण महिन्यात चौकाचौकामध्ये दररोज महिनाभर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात येते. तसेच हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींच्या निधनाचे सुतक संपूर्ण हिंदू समाजाला लागू असल्याच्या श्रद्धेतून महिनाभर चप्पल न घालणे, गोड न खाणे, मुंडण करणे, मांसाहार वर्ज्य करणे, गादी न वापरणे, आनंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे, आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे असे व्रत पाळले जाते.
सोलापुर शहरातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर बलिदान मास पाळला जात असून ७८ ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना दररोज श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी (यंदा १८ मार्च) मुकपदयात्रेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करून धर्मवीर बलिदान मासाची सांगता होणार आहे.
रविवारी सकाळी सामूहिक मुंडण करण्यासाठी गणपती घाटावर तरुणांची मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी घाटावर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर तरुणांनी सामूहिक मुंडण केले. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























