पंढरपूर : श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता तसेच मंदिरातील व मंदिराबाहेरील सर्व परिवार देवतांना ग्रहण स्पर्शानंतर चंद्रभागा नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात आले. ग्रहण मोक्षानंतर सायंकाळी ६.४८ वाजता सर्व देवतांना पुन स्नान घालून शुद्धीकरण विधी पूर्ण करण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
पहाटे ४ ते ५.५५ वाजता नेहमीप्रमाणे काकड आरती व नित्यपूजा, सकाळी १०.४५ ते ११.०० वाजता महानैवेद्य दाखवण्यात आला. महानैवेद्यामध्ये नेहमीचा नैवेद्याऐवजी सुकामेवा नैवेद्य दाखविण्यात आला. पोशाख/दुपारचा नैवेद्य (४.३० ते ५.०० वाजता) ग्रहणाचा वेध सुरु होणार असल्याने लाडवाचा नैवेद्य न दाखविता, सुकामेवा दाखविण्यात आला.
ग्रहण असल्याने दिवसभर मंदिरात भाविकांची गर्दी कमी होती. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन झटपट मिळत होते.
———————-
१४ मिनिटांच्या कालावधीत ग्रहण नियम पाळले
पंचांगानुसार ग्रहणाचा स्पर्श सायंकाळी ६:३४ तर मोक्ष सायं. ६:४८ होता. पंढरपुरात सूर्यास्त सायंकाळी ६.३४ वाजता होत असल्याने सायंकाळी. ६:३४ ते ६:४८ अशा १४ मिनिटांच्या कालावधीत ग्रहण नियम पाळण्यात आले.






















