सोलापूर – बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी कर्मचारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्यामुळे शासनाच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने जामगुंडी येथील मंगल कार्यालयात २०२५ वर्षातील आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील १६ ग्रामीण प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये १६ अंगणवाडी पर्यवेक्षिका, ४८ अंगणवाडी सेविका आणि ४८ मदतनीस यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमात बोलताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत शासनाच्या अनेक महत्त्वाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये ‘लेक लाडकी योजना’, ‘एकल महिला सर्वेक्षण’, ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ तसेच ‘आदिशक्ती योजना’ या योजनांचा समावेश आहे.
या योजनांद्वारे महिलांचे आरोग्य, पोषण आणि सामाजिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका अत्यंत जबाबदारीने व प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या समर्पित सेवेमुळे शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचाही विशेष संदेश देण्यात आला. महिलांचे सशक्तीकरण, समाजातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्व यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. अंगणवाडी सेविका व मदतनिस या ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाचे जिवंत उदाहरण असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच माता-बाल आरोग्याच्या जपणुकीसाठी अंगणवाडी सेविकांचे कार्य समाजासाठी अत्यंत मोलाचे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप रुपनर, शिवानंद मगे, साहेबराव देशमुख, रेणुका प्रथमशेट्टी, पांचाळ, अमिता वसेकर, निर्मला कोरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास अंगणवाडी कर्मचारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























