सोलापूर : हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कष्टकरी कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांचाच वारसा पुढे चालवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील मुलीला सर्वोच्च अशा सभागृहात खासदार केले. काहींना कुटुंब हाच पक्ष वाटतो तर शिंदे साहेबांनी कार्यकर्ता हेच कुटुंब मानले आहे असे सांगतानाच सर्वांना अभिमान वाटेल असं गल्लीतला आवाज दिल्लीत पोहोचवेन.लढत राहीन असेच पाठबळ द्या अशी भावना राज्यसभेच्या नूतन खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.
राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या आज सोलापुरात आल्या असताना सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी विचारमंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे , अमर पाटील, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा , विश्वभूषण लिमये आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या, माझ्यासारख्या गरीब, मागासवर्गीय कष्टकऱ्यांच्या वस्तीत राहणाऱ्या एका पत्रकार , शिक्षिका असलेल्या मुलीला देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळेच संधी मिळाली. खासदार पदाची मला कधी कल्पना नव्हती. अनेक दिग्गज प्रतिस्पर्धी समोर असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा जोपासत एकनाथ शिंदे साहेबांनी मला ही संधी दिली आहे. कोणतीही जात, धर्म न पाहता त्यांनी सामाजिक न्याय गतिमान केला आहे. काही लोक आपले कुटुंबच पक्ष समजतात मात्र एकनाथ शिंदे साहेब आपल्या कार्यकर्त्याला कुटुंब समजतात. एवढा धाडसी निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनीच माझी डिपॉझिटही भरली आहे, असे ज्योती वाघमारे म्हणाल्या.
सोलापुरात एका जगजीवन राम वस्तीमध्ये राहणाऱ्या गरीबाच्या मुलीला पत्रकारितेच्या वारसा लाभला नसता तर मी इथपर्यंत पोहोचले नसते. त्यामुळेच मी इथे येताना श्रमिक पत्रकार संघाच्या पायरीवर नतमस्तक होऊन आत आले आहे. या पत्रकारितेने मला बोलण्याचे, लिहिण्याचे आणि विचार व्यक्त करण्याचे बळ दिले आहे. जेव्हा मी निवेदिका, पत्रकार , प्रवक्ता होते. प्रत्येक वेळेला पत्रकार बंधूनी मला भावाप्रमाणे पाठबळ दिले. साथ दिली. प्रत्येक संकटात, अडचणीमध्ये आणि यशातही खंबीरपणे पाठीशी राहिले म्हणून मी लढत राहिले. आज मी खासदार झाले नाहीतर तर प्रत्येक पत्रकार खासदार झाला आहे. सोलापुरात महायुतीतील एक पत्रकार नगरसेवक तर दुसरा एक पत्रकार खासदार झाला आहे. यामुळे पत्रकारांना आता अच्छे दिन आले आहेत असेही ज्योती वाघमारे यांनी सांगितले.
आज मी खासदार झाले आहे. एक निवेदिका, पत्रकार, शिक्षिका, मागासवर्गीय मुलगी म्हणून राज्यसभेत जात आहे. गल्लीतला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवेन. सर्वांना अभिमान वाटेल असे लढत राहील, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.
घोड्यावर बसून आल्या नूतन खासदार
चार हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे नूतन खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या घोड्यावर बसून श्रमिक पत्रकार संघापर्यंत आल्या. त्यानंतर घोड्यावर बसूनच त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत गेल्या. खासदार ज्योतीताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है चा नारा कार्यकर्त्यांनी दिला.
























