सोलापूर : महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या मागण्यांबाबत लवकरच महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित करून कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीने आज नूतन महापौर विनायक दादा कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे , स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, गटनेते वाहिदाबनो शेख , माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक गौतम कसबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार संघटना कृती समिती अध्यक्ष अशोक जानराव, आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शिरसट, अजय क्षीरसागर, लिंबराज जेटीथोर, बाळी मेंडपु , बाबासाहेब क्षीरसागर, प्रदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कामगार संघटनांच्या वतीने महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी थकीत महागाई भत्ता व पेन्शनसह सर्व कर्मचाऱ्यांना लागू करून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देऊन तफावत दूर करावी. लाड कमिटीतील 1975 पासून प्रलंबित पात्र वारसदारांचे सुमारे 650 अर्ज, तसेच रोजंदारी बदल कामगार 249 आणि जलशुद्धीकरण केंद्रातील, घंटागाडी व इतर विभागातील कंत्राटी तसेच मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करावे.
आर.सी.एच. केडर लिंकवर्कर (आशा वर्कर), नर्सेस, ए.एन.एम., पी.एच.एन. तसेच बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवेत कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता मिळवावी. परिवहन उपक्रमातील प्रलंबित अनुकंपा प्रकरणे निकाली काढून वारसदारांना नियुक्ती द्यावी.
उन्हाचा पारा वाढल्याने कामगारांच्या
कामाच्या वेळेत दोन तासांची कपात करा
विविध टप्प्यात रोजंदारी कामगार कायम होऊन सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या निर्णयानुसार पेन्शन द्यावी. आरोग्य निरीक्षक व फिरते काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वाहन भत्ता वाढवावा.उन्हाचा पारा वाढल्याने स्वच्छता कामगार, जमादार व आरोग्य निरीक्षक यांच्या कामाच्या वेळेत दोन तासांची कपात करून कामावर असताना पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

























