पुरंदर – महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा यांच्या खंडोबा मंदिर, जेजुरी येथे यंदाची रंगपंचमी अनोख्या पद्धतीने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. जेजुरगडावरीvल श्री मल्हारी मार्तंड यांच्या प्रतिमांना विविध नैसर्गिक रंगांनी सजवण्यात आले होते. धार्मिक विधीनंतर सर्वप्रथम गाभाऱ्यात श्रींवर रंगांचा शिडकावा करण्यात आला आणि त्यानंतरच भाविकांसाठी रंगपंचमीचा उत्सव सुरू झाला.
यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पर्यावरणपूरक रंगांचा वापर. श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने मराठवाडा आणि विदर्भातील महिलांच्या बचत गटांकडून तयार करण्यात आलेले नैसर्गिक रंग आणण्यात आले होते. हे रंग पूर्णपणे वनस्पतींपासून तयार केलेले असल्याने ते शरीराला सुरक्षित असून मंदिरातील ऐतिहासिक वास्तू, दगडी बांधकाम आणि मूर्तींना कोणताही अपाय होत नाही.
या रंगांच्या निर्मितीसाठी फुलं, पानं आणि औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आला होता. उदाहरणार्थ –
झेंडू आणि पलाश फुलांपासून पिवळा व केशरी रंग
बीटरूटपासून गुलाबी व लाल छटा
हळद आणि चंदनापासून पिवळसर रंग
पालक व इतर पानांपासून हिरवा रंग
हे रंग रासायनिक घटकांपासून मुक्त असल्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होत नाहीत तसेच पाण्यात मिसळल्यानंतर पर्यावरणालाही हानी पोहोचवत नाहीत. त्यामुळे परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
जेजुरगडावर पहाटेपासूनच सनई-चौघड्यांच्या निनादात भूपाळी आरती झाली. त्यानंतर विशेष धार्मिक कार्यक्रमात खंडोबाच्या ऐतिहासिक मूर्तींवर रंगांचा शिडकावा करण्यात आला. गुरव पुजाऱ्यांनी विधीपूर्वक जणू रंगांचा महाअभिषेकच देवाला अर्पण केला.
यानंतर गड परिसरातील गुरव, कोळी, घडशी, विहीर सेवेकरी, मानकरी, खांदेकरी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत रंगांची उधळण केली. मंदिराचा गाभारा आणि संपूर्ण गड परिसर विविध नैसर्गिक रंगांनी नटला होता. श्री मार्तंड भैरव यांच्या रंगपंचमीतील या मनमोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.
या सोहळ्यावेळी विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे तसेच देव संस्थानचे कर्मचारी व अधिकारी बाळासाहेब खोमणे, गणेश तिकडे, महेश शिंदे, नाणेकर, दादा खोमणे, जावळकर, राहुल कुदळे आणि आनंद शिर्के यांनी पारंपरिक रंगपंचमीचे आयोजन केले होते.
पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून साजरी झालेली ही रंगपंचमी परंपरा, श्रद्धा आणि पर्यावरण जपण्याचा सुंदर संगम ठरली.

























