मोडनिंब – श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून मोडनिंब (ता. माढा) येथील विद्यानगरी सोसायटी शिवाजीनगर परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार (दि. १७ मार्च) रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री स्वामी सारामृत पारायण होणार आहे. बुधवार (दि. १८ मार्च) रोजी सायं. ६.१५ वाजता ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. जयंत करंदीकर यांचे प्रवचन होणार आहे. गुरुवार (दि. १९ मार्च) रोजी सायं. ६.१५ वाजता ज्येष्ठ प्रवचनकार व शेतीतज्ज्ञ मनोज शहा यांचे प्रवचन होणार आहे.
शुक्रवार (दि. २० मार्च) रोजी सायंकाळी ५ वाजता कीर्तनकार किरण महाराज सुरवसे यांचे प्रकटदिनानिमित्त कीर्तन होईल. त्यानंतर सायं. ७ वाजता उपासना व तारकमंत्र, तर सायं. ७.२० वाजता पुष्पवृष्टी, आरती, पालखी प्रदक्षिणा व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून स्वामी भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन व भक्तीची अनुभूती मिळणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात येत असून विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. मोडनिंब व पंचक्रोशीतील स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
























