माढा – तालुक्यातील मोडनिंब येथे ग्रामदैवत श्री वेताळ परिवाराकडून रेल्वे स्थानकावर पुणे, मुंबई, शिर्डी, कुलबुर्गी, मैसूर तसेच कोल्हापूर व सातारा येथे जाणाऱ्या गाड्यांना थांबा देण्यात यावा, तसेच श्री उमा विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ये-जा सुविधेसाठी भुयारी मार्ग उभारण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी ग्रामदैवत श्री वेताळ परिवार मोडनिंबच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देत मोडनिंव रेल्वे स्थानकावर धाव घेतली. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्यांना स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच अडवून आंदोलन करण्यास मज्जाव केला.यानंतर ग्रामदैवत श्री वेताळ परिवाराचे पदाधिकारी व रेल्वे अधिकारी यांच्यात सुमारे दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, संबंधित मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले. पुणे, मुंबई, शिर्डी, कुलबुर्गी, मैसूर, कोल्हापूर
व सातारा मार्गावरील गाड्यांना थांबा देणे, विद्यार्थ्यांसाठी भूयारी मार्ग उभारणे आदी मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असेही सांगण्यात आले.
या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी
रेल्वे रोको आंदोलन तात्पुरते मागे घेतले. तथापि, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामदैवत श्री वेताळ परिवाराने रेल्वे प्रशासनाला दिला असून, हीअंतिम नोटीस समजावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
या आंदोलनात ग्रामदैवत श्री वेताळ परिवाराचे प्रमुख प्रकाश गिड्डे, हनुमंत कुंभार, अनिल शिंदे, ऋषिकेश कोठावळे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्ढे, सुभाष वेदपाठक,माजी सरपंच बाबुराव सुर्वे, शंकर कोठावळे, सुरेश जाडकर, दत्ता जाडकर, राजकुमार खडके, महादेव थिटे, जयवंत ओहोळ, सावता माळी , दत्तात्रय जाडकर तर रेल्वे विभागाकडून सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक ए. के यादव, विभागीय सुरक्षा आयुक्त दिनेश कनोजिया, सहाय्यक पोलीसा निरीक्षक अरविंद कुमरे आदी उपस्थित होते.


















