सोलापूर – महिला महाराष्ट्र केसरी होण्यासाठी आता स्पर्धात्मकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमृता पुजारी आणि अपेक्षा पाटील व वैष्णवी पाटील या यंदाच्या किताबावर दावेदारी करू शकतील, असे मत याआधीच्या पहिल्या तिन्ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचे जेतेपदाचे किताब जिंकणाऱ्या भाग्यश्री फंडने व्यक्त केले.
गतवेळच्या महाराष्ट्र केसरी जेतेपदाच्या लढतीत भाग्यश्रीने अमृताला पराभूत करीत विजेतेपद मिळवले होते. पण यंदा चौथ्यांदा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती पुरस्कारावर दावा करणार नसल्याचे भाग्यश्रीने स्पष्ट केले. यासंदर्भात भाग्यश्री म्हणाली, “माझा सध्या वजनी गट ५९ ते ६२ किलो आहे. महाराष्ट्र केसरी गटासाठी ६५ ते ७६ किलो वजनी गट पात्र ठरतो. इतके वजन वाढवणे आता अवघड असल्यामुळेच मी यावर्षी स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.”
महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी तू मागील तीन वर्षे कशी मेहनत घेतलीस, या प्रश्नाला उत्तर देताना भाग्यश्री म्हणाली, “ट्रिपल महाराष्ट्र केसरी किताबावर वर्चस्व राखणे, हे मुळीच सोप्पे नव्हते. गेली तीन वर्षे मी कसून मेहनत घेतली. वजन वाढवणे, विविध डाव-प्रतिडावांचा सराव करणे, लढतीचा सराव करणे याचा यात समावेश होता.”
“पुरुषांमध्ये महाराष्ट्र केसरी झाल्यावर शासकीय नोकरी मिळते. मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाली. पण अजूनही मला नोकरी नाही. आम्ही बरेच प्रयत्न केले. पण ते यशस्वी ठरले नाहीत,” अशी खंत भाग्यश्रीने प्रकट केली.

















