वेळापूर – ज्ञान, कर्तृत्व आणि मेहनतीचा गौरव करणारा लोकविकास मराठी मिडीयम स्कूल, वेळापूर येथील वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साह, अभिमान आणि प्रेरणेच्या वातावरणात संपन्न झाला. वर्षभर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव होत असताना संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत नामदेव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नांदगावचे माजी प्राचार्य संभाजी ढोपे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम महसूल अधिकारी प्रकाश भोसले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना ग्राम महसूल अधिकारी प्रकाश भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अथक परिश्रमांची जोड दिली पाहिजे. थोर समाजसुधारकांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणले, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवावा. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मनात ठेवून आनंदी वातावरणात सातत्याने अभ्यास केल्यास एमपीएससी व यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे; योग्य दिशा, परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ते नक्कीच उच्च शिखर गाठू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात संभाजी ढोपे म्हणाले की, लोकविकास शिक्षण प्रसारक संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी ज्ञानसंस्था आहे. शाळा दिखावा न करता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत असून येथील विद्यार्थी भविष्यात समाजासाठी आदर्श ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव चंद्रकांत नवले, आनंद बनकर, सोमनाथ बनकर, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल पांढरे, मुख्याध्यापक सुनिल पताळे, अजित बनकर तसेच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल साठे यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक सौ. विजया चापले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. अरुणा बनसोडे यांनी मानले.



















