निवधा बाजार – हदगाव तालुक्यातील चक्री येथे पंचक्रोशीतील प्रख्यात जागृत श्री हनुमंतरायांचे मंदिर आहे. प्रत्येक शनिवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. श्री हनुमंतरायांच्या चरणी इच्छित मागणे सफल झाल्याच्या अनेक आख्यायिका आहेत. आखाडा बाळापूर येथील रहिवासी तथा सोन्या चांदीचे व्यापारी ओंकार भीमाशंकर अमाणे हेही येथे दर्शनासाठी दर शनिवारी येतात. प्रतिवर्षी मंदिर परिसरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमही होत असतात.
यंदाही या मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहाची सांगता हनुमान जयंती दिनी २ एप्रिल रेजी हाणार आहे. त्यानिमित्त सराफा व्यापारी ओंकार अमाणे यांनी श्री हनुमंत रायांच्या चरणी तब्बल २.२१ लाखांची देणगी अर्पण केली आहे. ते दरवर्षी २१ हजारांची देणगी देत असतातच, परंतु मंदिर परिसरात होणारी विकास कामे पाहून त्यांनी यंदा उदारता दाखवत २.२१ लाखांची देणगी अर्पण केली. त्यांच्या या सामाजिक दायित्वाचे कौतूक करत गावकऱ्यांनी त्यांचा नागरी सत्कार केला. यावेळी मंदीर समितीच्या
विश्वस्तासह गावकरी उपस्थित होते. इच्छापूर्तीची अनुभूती-अमाणे
साधारणतः १५ वर्षांपूर्वी आखाडा बाळापूर येथे मी दुसऱ्यांच्या दुकानावर काम करीत होतो. तेव्हा एका शनिवारी मित्रासोबत चक्री येथील श्री हनुमंत रायाच्या दर्शनाला गेलो. तेव्हा मित्राने तू हनुमानासमोर मनोकामना मांड, देव
मनोकामना पूर्ण करतो असे सांगितले. तेव्हा मी हनुमंतरायासमोर नतमस्तक झालो आणि माझे स्वतःचे दुकान असावे ही इच्छा व्यक्त केली. काही दिवसातच ही माझी इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्येक शनिवारी चक्रीतील हनुमंत रायाच्या दर्शनाला येण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज मला सर्व काही मिळाले आहे ती देवाचीच कृपा आहे. म्हणून मी दरवर्षी माझ्या कमाईतील ३० टक्के वाटा सामाजिक उपक्रमासाठी खर्च करीत असतो. १० वर्षांपासून समाजातील ११ गरजू मुलींच्या लग्नातील अन्नदानाचा खर्च करतो तथा कन्यादानाला लागणारा खर्च करतो. हा उपक्रम मी अखंड चालू ठेवणार आहे असेही सोन्या चांदीचे व्यापारी ओंकार भीमाशंकर अमाणे यांनी बोलताना सांगितले.




















