मोहोळ – महाराष्ट्रासह परराज्यातीलही भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वडवळ (ता.मोहोळ)येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या यात्रेस चैत्र शुद्ध पौर्णिमा उद्या गुरुवार दि.२ एप्रिल २०२६ पासून श्रीं च्या तैलाभिषेकाने मोठ्या उत्साहात सुरूवात होणार असून यात्रेचा मुख्य कार्यक्रम गणासह श्रींच्या पालखीची मिरवणूक गुरुवार दि.९ एप्रिल रोजी निघणार आहे.
श्री क्षेत्र वडवळ (ता.मोहोळ ) येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यात्रेला गुरुवार दि.२ एप्रिल २०२६ पासून श्रींच्या तैलाभिषेकाने सुरुवात होणार आहे. रविवार दि.५ एप्रिल रोजी श्रीक्षेत्र मोहोळहून श्री क्षेत्र वडवळ येथे श्रींच्या पालखीचे आगमन व सोमवारी पहाटे खर्ग, भाकणूक तसेच नयनरम्य शोभेचे दारुकाम होणार आहे. गुरुवार दि.९ एप्रिल रोजी श्रींच्या पालखीची
गणासह सवाद्य मिरवणूक व भाकणूक, तसेच खर्गतीर्थ येथे गुरु-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा होणार आहे. शुक्रवार दि.१० रोजी श्रीक्षेत्र वडवाळहून श्रीक्षेत्र मोहोळकडे श्रींच्या पालखीचे प्रयाण व त्यानंतर जंगी कुस्त्यांचे मैदान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.११ एप्रिल रोजी तेल उतरविणे कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे.यात्रा शांततेत व नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी श्री नागनाथ देवस्थान यात्रा कमिटी, विविध मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
श्रीक्षेत्र वडवळ येथील यात्रेदरम्यानच्या कालावधीमध्ये शनिवार दि.४ रोजी सायं.६ वा. स्थानिक बाल कलाकारांचा धमाल नृत्य आविष्कार, रविवार दि.५ रोजी सायं.७ वा. समाज प्रबोधनपर संदीप मोहिते व अतुल हातेकर यांचे जुगलबंदी भारुड, सोमवार दि.६ रोजी सायं.७ वा. सई लकडे प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम, तसेच मंगळवार दि.७ रोजी भव्य खुल्या सोलो व ग्रुप डान्स स्पर्धा व बुधवार दि.८ रोजी ह.भ. प. श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी श्री नागनाथ यात्रा कमिटी, श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी व ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

















