मंगळवेढा – पाण्यची बचत ही केवळ गरज नाही तर आपली जबाबदारी आहे. पाण्याच्या बचतीसाठी आज आपण जागे झालो नाही तर भविष्यातला दुष्काळ आपल्याला टाळता येणार नाही. लहान-सहान सवयीतून पाण्याची बचत आपण करू शकतो, पाणी हे रोजच्या दैनंदिन वापरातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून पाण्याला जपा अन्यथा भविष्य कोरडे होईल असे प्रतिपादन प्रसिद्ध हास्य कवी व वक्ते सुनील जवंजाळ यांनी केले.
कै.नानासाहेब नागणे प्रशाला नगरपालिका मुलांची शाळा क्रमांक चार मध्ये आयोजित केलेल्या “पर्यावरण जागृती- निसर्ग आपला सोबती” या कार्यक्रमांतर्गत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक गंगाधर कोळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रद्धा देशमुख, प्रशालेतील शिक्षक भारत शिंदे, मारुती वाकडे, वर्षा दत्तू, शुभांगी पलंगे, मीनाक्षी मांडवे, अर्जुन आवताडे, श्रीमंत सोलनकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जवंजाळ म्हणाले की, आपल्या प्रशालेत असणाऱ्या प्रत्येक झाडाची प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडाला मित्र केले पाहिजे. आपण आपल्या मित्राची जशी काळजी घेतो तशीच झाड नावाच्या मित्राची काळजी घ्यायला हवी. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय आपल्याला जडली पाहिजे. मार्कलिस्ट मध्ये असणाऱ्या गुणांबरोबर आपण समाजात कसे वागतो हे गुण सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. कै. नानासाहेब नागणे प्रशाला नगरपालिका मुलांची शाळा क्रमांक चार मध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर येथील शिक्षकांच्या माध्यमातून विविध संस्कार रुजवले जातात. यावेळी कवी जवंजाळ विनोदी बोधकथांमधून पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले तसेच विविध कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशालेतील शुभांगी पलंगे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत शिंदे यांनी केले तर आभार मारुती वाकडे यांनी मांडले.
चौकट करणे-ज्या पद्धतीने विद्यार्थी पर्यावरण रक्षणाकडे लक्ष देतो तसेच त्याने आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे. आपण नेहमी सकस आहार घ्यावा. फास्ट फूड न खाता आहारात फळांचा वापर जास्त करावा. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सामाजिक स्वच्छतेचे नियम ही आपण पाळायला हवेत. शिक्षकांच्या माध्यमातून प्रशालेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल व विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक प्रगती बरोबर भावनात्मक प्रगती होते याचे समाधान सर्व पालकांना आहे.
श्रद्धा देशमुख
(अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती कै. नानासाहेब नागणे प्रशाला मंगळवेढा)
फोटो ओळी:- कै.नानासाहेब नागणे प्रशाला नगरपालिका मुलांची शाळा क्रमांक चार मध्ये आयोजित केलेल्या “पर्यावरण जागृती-निसर्ग आपला सोबती” या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सुनील जवंजाळ, व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रद्धा देशमुख, मुख्याध्यापक गंगाधर कोळी.















