सोलापूर – मंगळवेढा शहरामध्ये आघोरी पूजा व नरबळी बाबत व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत होता. त्यामध्ये मंगळवेढा शहरात किल्ला भाग या ठिकाणी एका घरामध्ये नरबळी सारखी अघोरी पूजा चालू आहे अशी माहिती व्हायरल होत होती. याबाबत चौकशी केली असता असा कोणताही प्रकार होत नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
याची माहिती पोलिसांना मिळताच पोनी बोरीगिड्डे, मंगळवेढा पोलीस ठाणे यांनी स्वतः सोबत बीट अंमलदार भेट दिली आहे. अजित सिंग राजपूत यांच्या राहते घरात, पाठीमागील दरवाज्याच्या समोर अंगणामध्ये असलेल्या औदुंबरच्या ( उंबर ) झाडाच्या बुंध्याजवळ एक सुमारे 4×4 लांबी रुंदीचा व सुमारे 6 फूट खोलीचा खड्डा काढला होता आणि त्या खड्ड्याच्या बाजूला, घराच्या भिंतीलागत पूजा केलेली दिसत होती. सदर ठिकाणी घरमालक सुरज सिंग राजपूत वय 52 वर्षे , त्यांचा मुलगा हर्षवर्धन रजपूत वय 21 वर्षे, त्याचा मित्र किशोर वेदपाठक वय 21 वर्ष, रा. मंगळवेढा आणि रेवणसिद्ध बीराप्पा हिरे कोरबू व 40 वर्ष राहणार हुंनचाळ, तालुका शिंदगी, जिल्हा विजापूर, कर्नाटक (पूजा विधी करणारा ) हे हजर होते. त्यांच्याकडे सदर विधी बाबत विचारपूस केली असता, सुरज सिंग राजपूत यांनी सांगितले की, त्यांच्या अंगणामध्ये असलेले औदुंबरचे झाडाचे बुंध्यामध्ये ठेवलेल्या श्री. दत्तात्रयांची मूर्ती दाखवून सदर ठिकाणी ते नित्तनियमाने पूजा करीत असल्याची माहिती सांगितली.
सदरचे औदुंबरचे झाड एका बाजूने वाळत असल्याने, ज्योतिषांनी त्यांना सदरचे झाड काढून टाकण्याचा सल्ला दिला होता तसेच ते काढण्यापूर्वी सदरचे झाडाची मुळी काढून त्याची पूजा करून नंतर, झाड काढून घेण्याबाबत सल्ला दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी झाडाच्या बुंध्यात खड्डा काढून त्याच्या मुळ्या काढून त्याची पूजा केली आहे. तसेच सदरचा खड्डा हर्षवर्धन रजपूत आणि त्याचा मित्र किशोर वेदपाठक या दोघांनी काढला आहे अशी माहिती दिली. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा चौकशी केली असता त्यांनी ही माहिती दिली. एकंदरीत चौकशीमध्ये सदर ठिकाणी कोणताही आघोरी प्रकार, नरबळी आढळून आला नाही. त्याबाबत त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग घेण्यात आले आहे.

















