किनवट – किनवट, आदिलाबाद मुख्य मार्गावर असलेल्या सुंकिडी-तामसी येथील इंडोसान सोगेनजी झेन मोनेस्ट्री ‘महाध्यान भूमी झेन अध्ययन आणि प्रशिक्षण महाविहार’च्या वतीने एका विशेष विचारधारा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीज्योत महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या संयुक्त औचित्याने ही प्रथम “बुद्ध-कबीर-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा परिषद” संपन्न होणार आहे.
‘प्रबुद्ध भारत निर्माण’ या मुख्य विषयावर आधारित ही परिषद मंगळवार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण किनवट-माहूर रोडवरील आदिलाबाद (तेलंगणा राज्य) येथील इंडोसान सोगेनजी झेन मोनेस्ट्री हे राहणार आहे.
या परिषदेचे अध्यक्ष झेन भिक्खू डॉ. शाकू बोधिधम्म यांनी या परिषदेविषयी घेण्यामागची भूमिका व्यक्त करताना सांगितले की, “महापुरुषांचे विचार हे केवळ पुस्तकात वाचण्यासाठी नसून ते प्रत्यक्ष आयुष्यात जगण्यासाठी आहेत. ‘प्रबुद्ध भारत’ घडवण्यासाठी बुद्ध, कबीर, फुले, शाहू आणि आंबेडकर यांची विचारधारा आजच्या काळात अधिक प्रासंगिक ठरत आहे.” या विचारांची व्यापक स्तरावर देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने आयोजित या परिषदेस बौद्ध उपासक, उपासिका आणि सर्व आंबेडकरवादी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.
या परिषदेत संविधानाचे गाढे अभ्यासक आयु. उपासक अनिल आ. जवादे (सचिव: डॉ. बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्था, हिंगणघाट) हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांतून समाजाला नवी दिशा देण्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, अशी विनंती ‘महाध्यान भूमी झेन अध्ययन आणि प्रशिक्षण महाविहार’च्या वतीने करण्यात आली आहे.
















