सोलापूर : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. संविधानाने सर्वांना ताठ मानेने जगण्याचा अधिकार आणि ताकद दिली.
डॉ. आंबेडकरांचे हे ऋण अवघा देश कधीही फेडू शकणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या विचारात जग बदलण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन मसाप पुण्याच्या मुख्य कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी केले.
येथील भीम प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ सोलापुरातील शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृह येथे थाटात पार पडला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. मसाप पुण्याच्या मुख्य कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले हे होते. याप्रसंगी विचारमंचावर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ,जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत ,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अमोल शिंदे , दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने , ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे, रावजी सखाराम हायस्कूलचे प्राचार्य भारत केत, उद्योजक पदमचंद राका , राजेंद्र शहा (कासवा ), डॉ. उदय वैद्य ,विठ्ठल शिवशरण, डॉ. शिवाजी पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.स्वाती महाळंक पुढे म्हणाल्या, भारतीय संविधानाचा एक अमृतकोश डॉ. बाबासाहेबानी आपल्याला दिला. त्यांचे हे ऋण न फिटणारे आहेत. सोलापूरच्या सामाजिक जीवन बहरलेले आहे. भीम प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे. डॉ. आंबेडकर याच्या विचाराचा वारसा हे प्रतिष्ठान पुढे चालवत आहे.
ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी भीम प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करून डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे महत्त्व सांगितले. सद्यस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षा महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग भिम प्रतिष्ठानने सुरू करावे ही सूचना केली. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक अमोल शिंदे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.
डॉ. आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचवावेत : चौगुले
अध्यक्षीय भाषणात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले म्हणाले, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचविले पाहिजेत. प्रत्येकाने संविधानाचे वाचन केले पाहिजे. डॉ. आंबेडकरांचे विचार आचरण करण्याची गरज आहे. भीम प्रतिष्ठानने विविध सामाजिक उपक्रम घेतले आहेत. त्यांचे कार्य गौरवास्पद आहे, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. अंजना गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक संस्थापक बाबा बाबरे यांनी केले. स्वागत
कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे यांनी केले. ॲड. विशाल मस्के यांनी आभार मानले. यावेळी संयोजक अमित बाबरे , प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, उपाध्यक्ष ॲड. विशाल मस्के , सचिव अकबर शेख ,कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे, , ॲड. स्वाती मस्के आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यांचा झाला पुरस्काराने सन्मान
यावेळी भीमराव मोरे (सामाजिक), सीमा भंडारी (शैक्षणिक ),बलभीम पारखे (कामगार ), किरण बनसोडे (पत्रकारिता), रुक्मिणी लांबतुरे (गौरव पुरस्कार), प्रकाश शेळके( विशेष गौरव पुरस्कार), रेणुका हिरेमठ (सन्मानपत्र), प्राजक्ता सोलंकर (सन्मानपत्र ) तर आदर्श पालक पुरस्काराने कृष्णा व रत्नमाला माने यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे 26 वे वर्ष आहे.
















