सोलापूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बाबतच्या विविध मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांना देण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेमधील बदली रोजंदारी, कायम, व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्यासंदर्भात महापौर व आयुक्त यांनी या विषयावर तातडीने नगर विकास खात्याकडे आपल्या स्तरावर बैठक आयोजित करून २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून न्याय मिळवून द्यावा. कर्मचाऱ्यांना विनामूल्य विमा मेडिकल कॅशलेस सुविधा लागू केली होती तीच योजना परत कर्मचाऱ्यांना लागू करावी. महाराष्ट्र शासन यांच्याकडून आपल्या मनपास जीएसटी अनुदानापोटी २८ कोटी, १० लाख रुपये येतात, त्यापैकी कर्मचाऱ्यांच्या वेतनास, व पेन्शन धारकास २६ कोटी ५० लाख खर्च होतात तरी महापौर साहेब व आयुक्त यांनी मनपास अजून जी.एस.टी च्या माध्यमातून ५ कोटीची रुपयाची वाढीव मागणी करावी. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांचे आडवांस व वेतन १० तारखेच्या आत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, यासह विविध मागण्याचा समावेश आहे.
मागण्या संदर्भात लवकरात लवकर प्रशासनासमवेत ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावणार असल्याचे आश्वासन महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, नगरसेवक विनोद भोसले, सत्यजित वाघमोडे, ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इकबाल तडकल, अरुण म्हेत्रे, पेन्शन संघटनेचे सचिव मुजीफ काझी,सुनील शिंदे उपस्थित होते.
























