सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे सोलापूर–मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या ५० वर्षांच्या यशस्वी सेवेनिमित्त दी. ०८ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात व दिमाखात सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. रेल्वेच्या नियोजित सुटण्याच्या वेळेपूर्वी (२२:३० वाजता) हा सोहळा पार पडला.
या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून शाखा अधिकारी, रेल्वे कर्मचारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, रेल्वेप्रेमी, प्रवासी संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला. सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या इंजिनची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली व हार घालून सन्मान करण्यात आला, ज्यातून या प्रतिष्ठित गाडीचा अभिमान व वारसा अधोरेखित झाला. तसेच ५० व्या वर्धापनदिनानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला, ज्यामुळे उत्सवाचे वातावरण अधिक आनंददायी झाले.
आरपीएफ बँडच्या सुरेल वादनाने कार्यक्रमात रंगत आणली आणि स्थानकावर उत्सवी वातावरण निर्माण झाले. तरुण रेल्वेप्रेमींनी सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या संस्मरणीय क्षणांचा फोटोफ्रेम सोलापूर विभागाला भेट दिला, ज्यातून या गाडीबद्दल लोकांच्या भावनिक नात्याचे दर्शन घडले.
या ऐतिहासिक प्रसंगी सोलापूर विभागाने प्रवाशांच्या सुरक्षितता, आराम व सेवागुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनरुज्जीवन केली. सिद्धेश्वर एक्सप्रेस आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करत असताना, ती आपला समृद्ध वारसा पुढे नेत लोकांना जोडत राहील, प्रगतीला चालना देईल आणि भारतीय रेल्वेच्या अविरत सेवेचे प्रतीक राहील.























