पंढरपूर – येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदी प्रवीण घन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिर समितीचे तत्कालीन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी चांगले काम केले होते. त्यांनी मंदिर प्रशासनामध्ये शिस्त लावुन सुसुत्रता आणली होती.
यामुळे मनोज श्रोत्री हे मंदिर समितीचे काही सदस्य तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना नकोसे झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर तथाकथित आरोप लावून त्यांची बदली करण्यात आली.
त्यानंतर मंदिर समितीचे कामकाज सहव्यवस्थापक पहात होते. यामुळे हे काम पाहत असताना सहव्यवस्थापकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मंदिर समितीस कायमस्वरुपी व्यवस्थापक मिळावा अशी मागणी वारंवार बातम्यांच्या माध्यमातून वृत्तपत्रांमधून करण्यात येत होती.
अखेर वृत्तपत्रांमधील बातम्यांची विधी व न्याय विभागाने दखल घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदी सोलापूर येथील निवडणूक शाखेतील नायब तहसीलदार प्रवीण घन यांची नियुक्ती केली आहे. यामुळे भाविकांना सुविधा मिळणार असून मंदिर समितीच्या कामकाजाला शिस्त लागेल अशी अपेक्षा वारकरी भाविकांमधून केली जात आहे.
























