मोडनिंब – भगवंताचे तीन रूप आहेत. पहिले सत्, चित्त आणि आनंद अशी तीन रूप आहेत. परमात्मा सदस्वरूप आहे. परमात्मा चित्त स्वरूप आहे. आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. जगताला निर्माण करणे, जगताच पालन करणे ही भगवंताची कार्य असल्याचे परम पूज्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी श्रीमद भागवत कथेचे प्रथम पुष्प गुंफताना विवेचनात सांगितले.
मोडनिंब (ता.माढा) येथे बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांची भागवत कथा भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरु आहे. प्रारंभी या संगीतमय कथेचे पुष्प गुंफताना बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी कलीयुगामध्ये परमात्म्याचे नाम, भगवंत दर्शन आणि साधुसंगती श्रेष्ठ असल्याचे सांगितले . आद्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप व आदिदैविक हे त्रिविध ताप आहेत.तीन तत्व आहेत, तो परमात्मा आहे. पंचतत्व तो जीव आहे. निर्मिता ईश्वर आहे. भोक्ता जीव आहे.
संतांच्या विचारांनुसार जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या शिकवणीचे स्मरण करून दिले. तसेच संत सावता महाराज आणि श्रीपाद बाबा यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. जगताना संतांचे विचार घेऊन जगा. आत्महत्या पाप आहे. ज्ञान प्राप्त झाले की, अज्ञान नष्ट होते.अज्ञान गेल की जीव मत्सर रहित होतो. जो मत्सर रहित झाला तो कृष्णकृपेचा अधिकारी झाला. पांडुरंग कृपेचा अधिकारी झाला.
मोडनिंब येथे गुरुवार पासून कथेला सुरवात झाली. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपादबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त या संगीतमय सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री संगनबसवेश्वर मठ येथे सप्ताह पार पडणार आहे. रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात टेंभुर्णी, मोडनिंब, अरण व बावी, गिड्डेवाडी, आष्टी, तेलंगवाडी, शेटफळ, जाधववाडी, तुळशी, बैरागवाडी,भेंड येथील हजारो भाविक सहभागी होतात. प्रासादिक अमृत वाणीतून कथा श्रवनाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

























