धाराशिव – भारतीय संगीत विश्वातील सुवर्णयुग घडवणाऱ्या, अष्टपैलू गायकीनं सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशासाठी अत्यंत वेदनादायी ठरली. मात्र त्यांच्या आयुष्याचा एक भावनिक आणि अभिमानास्पद धागा धाराशिव जिल्ह्याशीही जोडलेला आहे, हे अनेकांना माहीत नाही.
धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक गावचे सुपुत्र प्रख्यात आर्ट डिझायनर ख्वाजाभाई सय्यद (मुबंई ) यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाची वर्षे आशाताईंच्या सहवासात घालवली. त्यांच्या या प्रवासामुळे धाराशिवचा एक कलाकार थेट जागतिक दर्जाच्या संगीतविश्वाशी जोडला गेला.
ख्वाजाभाई सय्यद यांनी आपल्या कारकिर्दीत ‘लिजेंड्स’, ‘अनमोल रतन’, ‘गोल्डन कलेक्शन’, ‘सॉलिड गोल्ड’ आणि ‘जीवनगाणे’ यांसारख्या प्रीमियम सिरीजसाठी डिझाइन केले. या सिरीजमध्ये मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव आणि मंगेश पाडगावकर यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. भावगीते, भक्तिगीते, ‘स्वराशा’, ‘भावआशा’ अशा विविध प्रकारच्या अल्बमसाठी त्यांनी केलेले डिझाइन हे त्यांच्या कलेची साक्ष देतात.
पुण्यातील ‘सरहद्द म्युझिक’च्या माध्यमातून आशाताईंच्या दुर्मिळ काश्मिरी गाण्यांच्या सीडी प्रकाशनावेळी त्यांना त्यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी भेट देण्याचा योग आला. तिथे आर. डी. बर्मन (पंचमदा) यांच्या वाद्यसंग्रहाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. हा अनुभव त्यांच्या शब्दात ‘अविस्मरणीय’ ठरला.
लहानपणापासूनच संगीत आणि कलेची ओढ असलेल्या ख्वाजाभाई सय्यद यांनी १९९६ साली मुंबईत T-Series या नामांकित कंपनीत कामाला सुरुवात केली. त्या काळात त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं. दिग्गज कलाकारांना भेटण्याचं आणि त्यांच्या अल्बमसाठी डिझाइन करण्याची संधी मिळवण्याचं. नशीब आणि मेहनत यांची सांगड घालत त्यांनी पुढे HMV Saregama (सारेगमा) या प्रतिष्ठित म्युझिक कंपनीत २००० साली प्रवेश केला. सुरुवात मराठी अल्बमपासून झाली, पण त्यांच्या सर्जनशीलतेमुळे आणि मेहनतीमुळे लवकरच त्यांची निवड विशेष आणि प्रीमियम अल्बम डिझाइनसाठी होऊ लागली.
चौकट
आशाताईंसोबतचा अविस्मरणीय सहवास
ख्वाजाभाईंना जेव्हा लता मंगेशकर आणि आशाताईंच्या अल्बमसाठी काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तो त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण ठरला. ‘जीवनगाणे’ सारख्या अल्बमच्या डिझाइन दरम्यान त्यांना आशाताईंना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी सुप्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राज्याध्यक्ष यांच्या माध्यमातून घेतलेले आशाताईंचे दुर्मिळ फोटो आजही ख्वाजाभाईंच्या संग्रहात जपलेले आहेत. जिवनगाणे या अल्बम पूर्ण झाल्यानंतर आशाताईंनी त्या डिझाइनचं मनापासून कौतुक केलं आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला हा क्षण ख्वाजाभाईंसाठी आयुष्यभराचा ठेवा ठरला.
धाराशिवसाठी अभिमानाचा क्षण
धाराशिवच्या मातीतून घडलेल्या कलाकाराने जागतिक कीर्तीच्या गायिकांसोबत काम करत आपल्या कलेचा ठसा उमटवला, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. स्वर्गीय आशाताईं सोबतचा सहवास, त्यांचे कौतुक आणि मिळालेल्या आठवणी हे सर्व ख्वाजाभाई सय्यद यांच्या आयुष्यातील अमूल्य ठेवा ठरले. आज आशाताई आपल्यात नसल्या तरी त्यांच्या स्वरांचा गंध आणि अशा अनेक कलाकारांच्या आठवणींमधून त्या सदैव जिवंत राहतील.देशाच्या लाडक्या गायिका पद्मविभूषण आशाताई भोसले यांना भावपूर्ण आदरांजली..z





















