सोलापूर : महापालिकेच्या पुढाकारातून हद्दवाढ क्षेत्रातील गुंठेवारी प्रकरणे व नोटरी नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष शिबिरांची मालिका सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी १६ ते ३० एप्रिल दरम्यान प्रभागनिहाय शिबिरे आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
या उपक्रमांतर्गत १६ एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक १९ मधील नीलम नगर परिसरातील नवदुर्गा देवस्थान येथे पहिले शिबिर पार पडले. नगररचना विभाग, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या शिबिरात प्रभाग १९ च्या नगरसेविका कविता गज्जम, नगरसेवक कोंडी व्यंकटेश , कलावती गदगे आणि बसवराज केंगनाळकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आयोजनात मोलाचे योगदान दिले. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्वतः शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन करत उपक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
शिबिरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल ३५० नोटरी धारक मिळकतदारांनी अर्ज सादर केले. नोटरीद्वारे खरेदी केलेल्या मिळकतींचे नियमित नोंदणीकृत दस्त करण्यात इच्छुक असलेल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. तसेच सातबारा उताऱ्यावर नोंदी असलेल्या मिळकतधारकांनी गुंठेवारी अंतर्गत मोजणीसाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही सांगण्यात आले. मात्र, या परिसरातून गुंठेवारी मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे अद्याप अर्ज प्राप्त झालेले नाहीत.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख विभाग तसेच महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक अभियंते शकील शेख, महेश क्षीरसागर, आनंद जोशी, प्रभाग अभियंता प्रमोद गोविंदवार आणि इतर अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरांद्वारे प्रत्येक प्रभागात मिळकतधारकांकडून आवश्यक अर्ज व कागदपत्रे स्वीकारली जाणार असून, चुकलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठीचे अर्ज मुद्रांक विभागाकडे तर गुंठेवारी मोजणीसाठीचे अर्ज भूमी अभिलेख विभागाकडे तत्काळ पाठविण्याची कार्यवाही शिबिरस्थळीच केली जाणार आहे. अर्जदारांची माहिती व संपर्क क्रमांक नोंदवून प्रकरणांचा पुढील पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे.
























