सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेचे उर्वरित तीन हप्ते शिक्षक दिनापूर्वी अदा करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, मनपा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांना देण्यात आले.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या नियमानुसार सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेचे पाच समान हप्त्यांत वितरण होणे अपेक्षित होते. महानगरपालिकेकडून आतापर्यंत केवळ पहिला आणि दुसरा हप्ता अदा करण्यात आला असून तिसरा, चौथा आणि पाचवा हप्ता अद्यापही प्रलंबित आहे. शासनाकडून यासाठीचा निधी उपलब्ध झालेला असल्याने महापालिकेने उर्वरित थकीत रक्कम तातडीने शिक्षकांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.शिक्षक दिनापूर्वी थकीत हप्ते मिळाल्यास शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, कोषाध्यक्ष संदीप घोळवे, संघटक राहुल पाटील, प्रसन्न निकंबे तसेच सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.