सोलापूर – मतदारसंघातील गावांच्या शाश्वत विकासाच्या कृतीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.गुरूवारी, जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, यशदाचे उपसंचालक आनंद पुसावळे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, उपसंचालक वित्त रमेश लिदडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ उपस्थित होते. प्रारंभी प्रास्तविक व स्वागत उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी व जिल्हा परिषद व पंचायत समिती रचनेबाबत माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी १५ वा व १६ वा वित्त आयोगातील बंधित व अबंधित निधीच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती सदस्यांना द्यावी अशी मागणी केली. याप्रसंगी सभापती अमृता वाघे यांनीही मनोगत व्यक्त केले.
चौकट
अध्यक्ष व उपाध्यक्ष पाठीमागील बाकावर
नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सभापती चेतनसिंह केदार, रामप्पा चिवडशेट्टी यांनी सभागृहात पाठीमागील खुर्चीवर बसून प्रशिक्षण घेतले. प्रमुख पदाधिकारी यांनी दाखविलेली नम्रता आज चर्चेचा विषय होता.
मायक्रो प्लॅनिंगशिवाय विकास अशक्य
पाच वर्षांचा कार्यकाळ पाहता पाहता संपतो, त्यामुळे प्रत्येक झेडपी सदस्याने मायक्रो प्लॅनिंग करून मतदारसंघाचा विकास साधला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे महत्त्व अधोरेखित करीत कंपन्यांच्या सीएसआरनिधीचा योग्य अभ्यास करून तो विकासासाठी वापरणे गरजेचे आहे. झेडपी सदस्यांकडे सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व स्तरांवरील कामे येतात, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे, असे मत पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केले.

























