सांगोला – नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तापलेले राजकीय वातावरण शांत झालेले असताना आता मात्र नैसर्गिक रित्या उन्हामुळे सांगोला तालुक्यात वातावरण चांगलेच तापले असून दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वाढत्या उन्हात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि थंडावा मिळवण्यासाठी नागरिकांनी आता नैसर्गिक पेयांकडे आपला मोर्चा वळवला आहे. विशेषतः उसाच्या रसाला मोठी मागणी वाढली असून रसवंतीगृहे ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.
सध्या एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उसाचा रस हा अधिक आरोग्यदायी आणि स्वस्त पर्याय असल्याने लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण याला पसंती देत आहेत. सांगोल्यात शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या रसवंतीगृहांवर दुपारी ११ ते ५ या वेळेत मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने रसवंती चालकांचा व्यवसाय तेजीत आहे.
उसाचा रस हे उर्जादायी नैसर्गिक व उन्हाळ्यात शरीर थंड करण्यासाठी एक उत्तम पेय आहे. त्यामुळे ऊन्हामुळे आलेला अशक्तपणा दूर होतो तसेच शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. पचनास मदत करते. त्वचेसाठी फायदेशीर आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. कावीळ आजारावर उपायकारक असून त्वरीत ऊर्जा प्रदान करते. हे उसाच्या रसाचे फायदे असल्यामुळे नागरिक याला पसंती देत आहेत.
सध्या उसाचा रस लहान ग्लास वीस रुपये व मोठा ग्लास पंचवीस रुपये असून बिगर बर्फ ऐंशी रुपये तर बर्फा सहित सत्तर रुपये लिटर असा दर आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आम्ही काढून देत असलेल्या ताज्या उसाच्या रसाला मागणी व चांगला प्रतिसाद आहे.
– काकासो भागवत, भागवत रसपान गृह, सांगोला.





















