जेऊर – केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या धोरण अंतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन झालेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीची वाटचाल प्रेरणादायी असून सह्याद्रीच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करणारी सशक्त कंपनी म्हणून राजे रावरंभा कंपनी भविष्यात पुढे येईल असा आशावाद सोलापूर जिल्ह्याचे कृषी अधिक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दि.२४ रोजी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
कंपनीच्या विस्तारित नवीन युनिटच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके ,डी.डी.एम नितीन शेळके ,वॉटरशेड ट्रस्टचे कांतीलाल गीते, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे ,पंचायत समिती सदस्य भरत अवताडे, विवेक येवले ,सुजित बागल, अजय कुमार बागल ,डॉ.अमोल गोफणे,लता तिटके,शोभा अंधळकर, दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांसोबत आहेच. रोजगार हमी योजना, ठिबक अनुदान ,फळबाग अनुदान योजना, अवजार बँक अनुदान योजना इ. योजनांच्या माध्यमातून सरकार आपल्या सोबत असेल तिथं सरकारच्या मदतीने आणि जिथे सरकार मदतीला नसेल अशा ठिकाणी शेतकरी कंपन्यांनी एनजीओच्या मदतीने काम करणे ही काळाची गरज आहे. जुन्या सहकाराचे आजचे बदललेले रूप म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी आहे.शासन आणि शेतकरी यांच्यातील कणा म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी आहे. येणारा काळ हा या कंपन्यांचा काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीचे सभासद होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट चे कांतीलाल गीते म्हणाले की, शासन अनुदान तसेच वॉटर, वॉलमार्ट यांच्या सहकार्याने मिळालेल्या निधीचा अतिशय योग्य उपयोग राजे रावरंभा कंपनीने केल्यामुळे आज कंपनी योग्य दिशेने वाटचाल करत आहे.यावेळी डीडीएम नितीन शेळके,तहसीलदार शिल्पा ठोकडे, पंचायत समिती सभापती पूजा ढेरे, पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांच्यासह आय सी एल ,जय किसान ,आर्या शक्ती या कंपनीच्या प्रतिनिधींनी शेती,माती, खते याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनी अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी केले.सूत्रसंचालन अरुण चौगुले यांनी तर आभार प्रा. बिभीषण मस्कर यांनी मानले.
कंपनीच्या “या” शेतकरी सुविधा बेंद फाटा येथे सुरू झाल्या…
ऍग्रो मॉल, टिशू कल्चर केळी व डाळिंब रोपे, ठिबक, पीव्हीसी पाईप, रासायनिक खते व औषधे,जैविक निविष्ठा – निर्मिती, विक्री व मार्गदर्शन ,विषमुक्त धान्य खरेदी विक्री, कोल्ड स्टोरेज, 60 टन क्षमतेचा वजन काटा, गांडूळ बेड युनिट, 10 ड्रम युनिट, फवारणी ड्रोन, पावर टेलर, विडर, ग्रास कटर ,एचटीपी पंप, वेदर स्टेशन, अंकुश पाटील तंत्रज्ञान औषधे या सुविधांचा शुभारंभ झाला. या सर्व सुविधा शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध होणार आहेत.























