बार्शी – मातृभाषेच्या अभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर मराठी भाषेच्या अभिमाना बरोबरच वाचन, लेखन, संभाषण इत्यादी कौशल्यासह इंग्रजी भाषा सर्वांनी आत्मसात करावी, असे आवाहन सचिन उकिरडे सर यांनी केले. लोकसेवा विद्यालया आगळगाव येथील इंग्लिश डे या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार चौधरी सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ्. वंदना यादव यांनी करुन विल्यम शेक्सपियर यांच्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर मामासाहेब जगदाळे आणि विल्यम शेक्सपियर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
उकिरडे पुढे म्हणाले की, मातृभाषा ही आपल्याला आपली संस्कृती, रोजगाराच्या संधी आणि जीवन आनंदाने असे जगावे हे शिकवते तर इंग्रजी भाषा आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवून जागतिक स्तरावर आपल्याला विविध संधी निर्माण करते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी तेजस्विनी कदम, सिद्धेश्वरी कदम, सानिका जाधव, अक्षदा विधाते, संध्या बनसोडे, पूजा विधाते या विद्यार्थिनींनी आपले मनोगत इंग्रजीमधून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया मिरगणे आणि समीक्षा विधाते यांनी केले.


























