सोलापूर : वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर युवतींना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती यांच्या ‘हर घर योद्धा’ अभियानांतर्गत सोलापूरमध्ये विविध ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी युवतींना कराटे, लाठी-काठी, निःशस्त्र युद्धकला, नानचाकू तसेच विविध स्वसंरक्षण तंत्रांचे सखोल प्रशिक्षण दिले. शारीरिक प्रशिक्षणासोबतच समाजात सुरक्षित वावर कसा ठेवावा, प्रसंगी तत्परतेने कसा प्रतिसाद द्यावा आणि हिंदु धर्माचरणाचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमांना समाजातील अनेक युवती व महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पुढील २ महिन्यांच्या कालावधीमध्ये सोलापूर शहरातील अनेक भागात अश्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पर्यंत जुने घरकुल, नीलम नगर आणि आकाशवाणी केंद्र परिसर याभागात हे शिबिर यशस्वी पार पडले आहे. यामध्ये ७५ हुन अधिक युवतींनी सहभाग नोंदवला आहे. शिबिराच्या शेवटी सर्व सहभागी युवतींना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यावेळी युवतींचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच नगरसेवक बसवराज केंगनाळकर, नगरसेविका कलावती गदगे, नगरसेविका सारिका खजूरगी, सकल हिंदू समाज संघटनेचे शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री. पवन देसाई यांनीही उपस्थिती दर्शवली.
या प्रशिक्षण शिबिरांमुळे युवतींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्वसंरक्षणाची जाणीव अधिक बळकट होत असून समाजात सुरक्षिततेचा संदेश पोहोचवण्यात हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या करीता हिंदु जनजागृती समितीचे प्रशिक्षक शिवलीला गुब्याड, शैलजा सामलेटी, अविनाश त्रिमल, धनंजय बोकडे, यश मुगड्याल, लिंगराज हुळळे इत्यादी प्रयत्न करत आहेत.


























