सोलापूर : सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी विविध कामांना गती दिली आहे. कर्मचाऱ्यांसाठी ३ टक्के महागाई भत्ता वाढ , रोजंदारीसाठी प्रतिदिन ५० रुपये, अंगणवाडी सेविका-शिक्षिकांना ५०० रुपये वाढ आणि १२० कर्मचाऱ्यांना सुमारे ४ कोटींच्या अर्जित रजेचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर विनायक कोंड्याल यांनी केली.
महापालिकेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन, सोलापूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त इंद्रभुवन येथे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महापालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका कल्पना कदम, संगीता जाधव, तसेच नगरसेवक ज्ञानेश्वर माकल, महेश देवकर, नागेश खरात, पृथ्वीराज कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, वीणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे,उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर विनायक कोंड्याल पुढे म्हणाले, दि. १ ते १५ मे २०२६ या कालावधीमध्ये नागरिकांनी “Self Enumeration” अर्थात स्वगणना करावयाची आहे. याकरिता भारत सरकार, गृह मंत्रालय यांनी http://se.census.gov.in हे ॲप उपलब्ध करून दिले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी या कालावधीत स्वगणना करून राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये २०६० पर्यंतच्या गरजांचा विचार करून “सोलापूर सिटी वॉटर सप्लाय इंटरनल डिस्ट्रिब्युशन सिस्टम” या सुमारे १३७८.४२ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना नियमित, पुरेशा दाबाने आणि न्याय्य पाणीपुरवठा सुनिश्चित होईल. शहरातील विविध भागांमध्ये लागू असलेल्या ‘ बी-२ सत्ता’ प्रकारासंदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि अग्निशमन सेवा या मूलभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यावर आमचा भर आहे.
कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्ता वाढ देत तो ४४ टक्क्यांवरून ४७ टक्के करण्यात आला आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ५० रुपये, तर अंगणवाडी सेविका-शिक्षिकांना दरमहा ५०० रुपयांची वाढ जाहीर तसेच १२० कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या सुमारे ४ कोटींच्या देयकांचे वितरण होणार असून, यामुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सोलापूरला स्वच्छ व आदर्श शहर बनवण्याचा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला.
पदोन्नती, वेतनवाढ व अनुकंपा नियुक्त्यावर विशेष भर
पदोन्नती, वेतनवाढ आणि अनुकंपा नियुक्त्यांवर विशेष भर देत कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यात आले. वर्षभरात ४० अनुकंपा नियुक्त्या, ५५ जणांना जमादार पदोन्नती, १०८ जणांना कालबद्ध पदोन्नती मिळाली. तसेच लाड समितीतून ४५२ नियुक्त्या आणि ३४१ वर्ग-४ कर्मचाऱ्यांना १०-२०-३० चा लाभ देण्यात आला.

























