मंगळवेढा – (ता. मंगळवेढा) येथे राष्ट्रीय पक्षी मोराच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असताना प्रशासन मात्र अद्यापही गाढ झोपेत असल्याचे चित्र समोर आले आहे. घटना घडून बराच कालावधी लोटूनही ना ग्रामपंचायतीने अधिकृत नोंद घेतली, ना वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
भीषण उष्णतेच्या लाटेमुळे आधीच हैराण झालेल्या वन्यजीवांना पाण्याचा व सावलीचा तीव्र अभाव भासत असताना मोरासारख्या राष्ट्रीय पक्ष्याचा मृत्यू होणे ही केवळ नैसर्गिक घटना नसून मानवी निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खुपसंगी परिसरात नैसर्गिक पाणवठे पूर्णतः आटले असून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच वाढती वृक्षतोड आणि हरित आच्छादनात झालेली घट यामुळे सावलीचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मोराचा मृत्यू होऊनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही तातडीची कारवाई करण्यात आलेली नाही. घटनास्थळी पंचनामा नाही, वैद्यकीय तपासणी नाही, अगदी प्राथमिक अहवालही तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप गूढच राहिले आहे. राष्ट्रीय पक्ष्याच्या मृत्यूबाबतही प्रशासन इतके उदासीन असेल, तर इतर वन्यजीवांचे काय होणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याअभावी पक्षी व प्राणी तडफडतात. वारंवार सूचना देऊनही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. आता मोराचा मृत्यू होऊनही कोणीही फिरकले नाही,ही अत्यंत लाजिरवाणी आणि निष्काळजी भूमिका आहे.
ग्रामस्थांच्या ठोस मागण्या ः-
मोराच्या मृत्यूची तात्काळ व सखोल चौकशी करावी, जबाबदार अधिकार्यांवर तातडीने कारवाई करावी, गावात कायमस्वरूपी पाणवठ्यांची उभारणी करावी, टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवावी.
तज्ज्ञांच्या मते, वाढते तापमान, पाण्याची तीव्र कमतरता आणि पर्यावरणीय असंतुलन यांचा एकत्रित परिणाम वन्यजीवांवर होत असून अशा घटना भविष्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशारा देण्यात येत आहे.


























