जेऊर – धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांची सुंदर सांगड घालत कुंभेज येथील शिंदे बंधूंनी एक अनोखा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. देवकार्याच्या धार्मिक कुळाचार कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छांनी नव्हे, तर फळझाडांच्या रोपांनी करत त्यांनी समाजाला पर्यावरणपूरक संदेश दिला.
बँक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गणेश शिंदे तसेच कापड व्यावसायिक किरण शिंदे यांनी आपल्या पारंपरिक धार्मिक कार्याला सामाजिक जाणीवेची जोड देत उपस्थित स्नेही, नातेवाईक व पाहुण्यांना तब्बल १५१ फळझाडांची रोपे भेट दिली. आंबा, जांभूळ, चिकू, सीताफळ आदी विविध फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले.
सध्या विविध समारंभांमध्ये दिखाऊ खर्चाला प्राधान्य दिले जात असताना शिंदे बंधूंनी पर्यावरण संवर्धनाचा विचार केंद्रस्थानी ठेवत केलेला हा उपक्रम विशेष ठरला. “प्रत्येकाच्या घरी एक झाड, प्रत्येकाच्या मनात निसर्गप्रेम” हा संदेश त्यांनी कृतीतून दिला.
धार्मिक परंपरा जपत समाजहिताचा विचार करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला. देवकार्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा शिंदे बंधूंचा हा उपक्रम इतरांसाठी दिशादर्शक,प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरत आहे.

























