पंढरपूर – शहरातून जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असतानाही प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.९) रात्री साडेअकराच्या सुमारास भक्तपुंडलिक पुलावर एका भाविकाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. स्थानिकांच्या माहितीनुसार, जड वाहतुकीमुळेच हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेनंतर माजी नगरसेवक विक्रमशिरसट यांनी तातडीने जड वाहतूक शहरा बाहेरून वळविण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना विक्रम शिरसट म्हणाले की, भक्त पुंडलिक पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असूनवारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. या दुर्घटनेसाठी नगरपालिका प्रशासन, पीडब्ल्यूडी आणि पोलीस वाहतूक विभागदेखील जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पुल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असून पोलीस वाहतूक विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, रात्री ११ नंतरभक्त पुंडलिक महाराज पुलावरून पायी चालत जाणाऱ्या एका भाविकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच विक्रम शिरसट व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.























