पंढरपूर – वस्तूवरील अवाजवी एमआरपी रद्द करा,उत्पादन मुल्य छापा यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने १ मे पासून देशभर आंदोलन सुरू केले असून ते अधिक तीव्र केले असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
दैनंदिन गरजेच्या वस्तू विशेषतः पॅकिंग केलेल्या वस्तू,कपडे,औषधे इ. पॅकिंग केलेल्या वस्तूवर सध्या २०० ते ३०० टक्के एमआरपी छापल्याने ग्राहकांची लूट होत आहे. त्यासाठी उत्पादन मूल्य छापावे यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याचा एक भाग म्हणून देशाचे पंतप्रधान,अर्थमंत्री,वाणिज्य मंत्री,ग्राहक संरक्षण मंत्री यांना देण्यासाठी निवेदन प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत एकाच वेळी देण्यात आले. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र निवेदने देण्यात आली.
अवाजवी एमआरपी देऊन वस्तू घ्यावी लागते या प्रकाराला ग्राहक वैतागला असून ग्राहकाचे खिसे रिकामे करण्याचे काम या कायद्याचा गैरवापर करून होत आहे ही बाब अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने लक्षात घेऊन सध्याचा एमआरपी कायदा रद्द करून वस्तुंचे उत्पादन मूल्य छापावे.नफा २० ते ३० टक्केपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी नविन कायदा करावा अशी लेखी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात नागरिक,सेवाभावी संस्था,कार्यकर्ते हे सहभागी होत असून नवीन कायदा करावा यासाठी पंतप्रधान,अर्थमंत्री,ग्राहक संरक्षणमंत्री, वित्तमंत्री यांना ग्राहक पंचायतीने दिलेल्या लिंकद्वारे आपले निवेदन पाठवावे असे आवाहन प्रांत सहसचिव दीपक इरकल, प्रांत सदस्य विनोद भरते, सुभाष सरदेशमुख,सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापुरकर, संतोष उपाध्ये यांनी केले आहे.
अवाजवी एमआरपी रद्द करून नवीन कायदा करावा अशा आशयाचे लेखी निवेदन पंढरपूरचे प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी सहाय्यक महसूल अधिकारी राजेश सावळे यांना जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हाउपाध्यक्ष,विनय उपाध्ये, तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सचिव महेश भोसले,उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,सहसचिव आझाद अल्लापुरकर, अमोल अभंगराव, सागर शिंदे,मंगेश देशपांडे,शशिकांत सुगंधी,विक्रांत कासेगावकर,शाम तापडिया,तेजस फडे इत्यादी ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.


























