सोलापूर – कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक संकटाचे विदारक चित्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत समोर आले आहे. उत्पादन खर्च, वाहतूक आणि बाजारातील विविध आकारणींच्या ओझ्याखाली शेतकरी अक्षरशः भरडला जात असल्याचे वास्तव एका विक्री पट्टीमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. कांदा विक्रीसाठी बाजारात आलेल्या एका शेतकऱ्याला माल विकून पैसे मिळण्याऐवजी उलट स्वतःच्या खिशातून ३०१ रुपये भरावे लागल्याची धक्कादायक घटना घडली.
श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील सिद्धनाथ ट्रेडर्स येथे संबंधित शेतकऱ्याने २४ गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता. एकूण १२ क्विंटल ८७ किलो कांद्याला केवळ १ हजार ४६८ रुपये इतकाच दर मिळाला. मात्र हमाली, तोलाई, गाडीभाडे आणि इतर खर्चाच्या नावाखाली तब्बल १ हजार ७६९ रुपये ८७ पैसे कपात करण्यात आली. परिणामी, व्यवहाराच्या अखेरीस शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा होण्याऐवजी “उर्वरित शिल्लक – ३०१ रुपये” अशी नोंद करण्यात आली.
या घटनेमुळे कांदा उत्पादकांच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. बियाणे, खत, औषधे, मजुरी, वीज व पाणी यांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना बाजारात मिळणारे दर मात्र घसरत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. अनेकदा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित विक्री पट्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून “शेतकऱ्याने शेती करायची तरी कशी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. कांद्याला हमीभाव जाहीर करावा, बाजारातील अतिरिक्त आकारणींवर नियंत्रण आणावे आणि उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.